शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या स्कॉर्पिओने अडवत चालक-वाहकाला शिवीगाळ व मारहाण करुन वाहकाच्या खिशातील हजारो रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेत बसच्या समोरील काचेवर दगड मारुन नुकसान करुन चक्क बसची चावी घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे 1:45 ते 2:00 वाजण्याच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कानिफनाथ मंदिराजवळील न्हावरे फाटा परिसरात घडली. या प्रकरणी एसटी चालक संदीप गणपत थोरवे (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरुर पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध जबरी चोरीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप थोरवे हे एसटी बस क्रमांक एमएच १४ एन पी ०८३८ पुण्याहून शिरुर बस आगाराकडे घेऊन येत होते. मध्यरात्री पुणे-नगर महामार्गावर कानिफनाथ मंदिराजवळ न्हावरे फाट्याच्या परिसरात अचानक काळ्या रंगाची, नंबर नसलेली स्कॉर्पिओ चारचाकी गाडी बससमोर आडवी लावण्यात आली.
एस टी बस थांबताच स्कॉर्पिओमधून अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील चार इसम खाली उतरले. त्यांनी चालकाजवळ जाऊन, ‘तुम्ही आमच्या गाडीला धक्का का दिला…?’ असा सवाल करत पैशांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चालकाने बसचा त्यांच्या वाहनाला धक्का लागलेला नसल्याचे सांगत, शिरुर बस आगारात जाऊन बसची पाहणी करु, असे सांगितले. मात्र, त्यानंतर परिस्थिती चिघळली. आरोपींनी चालकाला शिवीगाळ आणि दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून वाहक सतीश आण्णासाहेब बाचकर हे मदतीसाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपींपैकी एकाने ‘स्कॉर्पिओमधील कोयते काढा’, अशा स्वरुपाची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींपैकी एका इसमाने वाहकाच्या शर्टच्या वरच्या खिशात जमा झालेली ८ हजार ९६० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, दुसऱ्या आरोपीने रस्त्यावर पडलेला दगड उचलून एसटी बसच्या समोरील काचेवर जोरात फेकला. त्यामुळे बसच्या काचेचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी बसची चावीही ताब्यात घेतली आणि घटनास्थळावरून स्कॉर्पिओमधून पलायन केले.
एसटी कर्मचाऱ्यांवरच हल्ला; महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…
मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनाच महामार्गावर अडवून मारहाण, लूट आणि वाहनाची तोडफोड करण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. क्रमांक नसलेल्या वाहनातून आलेल्या चार व्यक्तींनी महामार्गावर एवढा धुडगूस घातला, हा प्रकार पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विशेष म्हणजे, वाहनाच्या किरकोळ धक्क्याच्या कारणावरुन सुरु झालेला वाद थेट मारहाण, धमकी, जबरी चोरी आणि एसटी बसच्या तोडफोडीपर्यंत पोहोचला. त्यामुळे अशा टोळक्यांना महामार्गावर कायद्याची भीती राहिली आहे का…? असा सवाल उपस्थित होत आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध…?
या घटनेनंतर शिरुर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे तसेच संशयित स्कॉर्पिओच्या हालचालींच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. चारही आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बसही सुरक्षित नसेल, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचे काय…? या घटनेमुळे शिरुर परिसरातील रात्रीची पोलिस गस्त आणि महामार्ग सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.