वढू बुद्रुक मधील त्या कंपनीला भीषण आग

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आगीमध्ये दोन कामगार जखमी तर कोट्यवधींचे नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीच्या लोळणे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, तर या आगीमध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या कंपनीमधून आज दुपारच्या सुमारास अचानक धुराचे तसेच आगीचे लोळ दिसू लागले त्यामुळे खळबळ उडाली यावेळी कंपनीतील कामगार बाहेर आले आणि काही नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र कंपनीमध्ये असलेल्या गॅसच्या टाक्या आगीच्या भास्मस्थानी पडल्याने आगीचे प्रमाण अचानक वाढले. मात्र यावेळी कंपनीतील दोन कामगार जखमी देखील झाले.

घटनेची सदर घटनेची माहिती मिळताच शिरुर उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ गरुड, पुणे जिल्हा विशेष शाखेमार्फत शिक्रापूर सेंटर साठी असलेल्या पोलीस हवालदार सुजाता भुजबळ, संदीप कारंडे, पोलीस नाईक राकेश मळेकर, रोहिदास पारखे, महेंद्र पाटील, अशोक केदार, हेमंत कुंजीर, महेंद्र पाटील, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, तलाठी शारदा शिरसाठ, कृष्णा आरगडे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.

मात्र सदर कंपनीच्या परिसरात आगविरोधी आवश्यक साहित्य व उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती, त्यांनतर पुणे महानगर विकास प्राधिकरण वाघोली, आळंदी नगरपरिषद, रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील अग्निशामक दलाच्या तुकड्यांनी सदर ठिकाणी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र सदर ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच कंपनीच्या बाजूने अग्निशामक दलाची वाहने फिरण्यासाठी जागा नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. आगीचे प्रमाण जास्त असल्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा साठा कमी पडत होता.

दरम्यान पुणे जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस हवालदार सुजाता भुजबळ यांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरातील खाजगी पाणी पुरवठादारांकडून पाण्याचे टँकर उपलब्ध करुन घेतले. यावेळी भरत गव्हाणे, प्रवीण गव्हाणे, गणेश गव्हाणे यांसह आदींचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्यान तब्बल अडीच तासाने आग आटोक्यात आली. सदर कंपनी मधील आगीचे कारण समजू शकले नसून कंपनीतील अचल सिंग व विवेक सिंग हे दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शेतकऱ्यांचे नुकसान वाचले…

वढू बुद्रुक ता. शिरुर येथे आग लागलेल्या कंपनीच्या बाजूने अनेक शेतकऱ्यांची शेती असून शेतात उस आहे, आगीचे लोळ शेतात गेल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते मात्र सुदैवाने शेतकऱ्यांचे नुकसान तळले गेले असल्याचे दिसून आले.

परिसरात अग्निशामक यंत्रणा उभी राहणार का?

शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप या परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून अनेकदा कित्येक कंपन्या आग लागून खाक झालेल्या असताना देखील अद्याप पर्यंत येथे अग्निशामक यंत्रणा उभी राहू शकलेली नाही त्यामुळे परिसरात अग्निशामक यंत्रणा उभी राहणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे