पिस्तुल घेऊन अभिवादनास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांनी पिस्तुल जप्त करत केला गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शासनाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेली असताना देखील पिस्तुल घेऊन आलेल्या भीमराव आसाराम खंदारे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत पिस्तुल जप्त केला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना परिसरात शस्त्रे, लाठी, काठी, तलवारी, पिस्तुल अशा वस्तून घेऊन येण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातलेली असताना देखील जयस्तंभ अभिवादन साठी आलेला एक व्यक्ती पार्किंग मध्ये पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार अमोल दांडगे, विकास पाटील यांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेत पाहणी केली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल व त्यामध्ये पाच राउंड मिळून आले.

दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता सदर पिस्तुल हे परवाना धारक असून बंदी असताना देखील त्या इसमाने जवळ बाळगले असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश माळी रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भीमराव आसाराम खंदारे (वय ६२) रा. डोंबिवली ओमसाई सोसायटी जि. ठाणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत सदर पिस्तुल जप्त केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.