शिरुर तालुक्यात तलवार बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे घरामध्ये तलवार बाळगणाऱ्या इसमाच्या घरावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत तलवार बाळगणाऱ्या युवकासह तलवार विक्री करणाऱ्या युवकाला जेरबंद केले असून अजय रघुनाथ चव्हाण असे तलवार बाळगणाऱ्या युवकाचे तर सुखदेव विठ्ठल दासरवड असे तलवार विक्री करणाऱ्या युवकाचे नाव असून दोघांनापोलिसांनी अटक केले आहे.

कर्डेलवाडी ता. शिरूर येथे एक इसम घरात तलवार बाळगत असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार वैभव मोरे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ, विजय शिंदे यांसह आदींनी कर्डेलवाडी गावामध्ये जात सदर इसमाच्या घरामध्ये जात छापा टाकला असता येथून एक इसम कावरा बावरा होऊन पळू लागला यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला जागेवर पकडले, यावेळी घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी तलवार मिळून आली. दरम्यान पोलिसांनी त्या युवकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय रघुनाथ चव्हाण असल्याचे सांगितले तर त्याच्याकडे तलवार कोठून आली याबाबत विचारपूस केली असता, त्याने सदर तलवार सुखदेव विठ्ठल दासरवड या इसमकडून विकत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुखदेव दासवड याची माहिती घेत त्याला देखील ताब्यात घेतले.

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विजय गजानन शिंदे (वय २९) रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अजय रघुनाथ चव्हाण वय २६ वर्षे व सुखदेव विठ्ठल दासरवड दोघे रा. कर्डेलवाडी ता. शिरूर जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना तलवारी सह जेरबंद केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करत आहेत.