ज्याप्रमाणे स्त्रियांना मातृत्वाची आस असते, आपले स्वतःचे बाळ हवे असे वाटत असते त्याचप्रमाणे पुरुषांना देखील आपले स्वतःचे बाळ हवे असते. त्यांच्या मध्ये देखील आपण पिता बनावे ही भावना प्रखरतेने असते. परंतु स्त्रिया या बाबतीत जितक्या मनमोकळेपणाने बोलतात तितके पुरुष बोलत नाहीत. काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, शुक्राणूंची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असणे हे असू शकते. काही वेळा असा दोष लक्षात येत नाही किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
१) नियमित व्यायाम करा: या विषयावर झालेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की नियमित व्यायाम करणाऱ्या पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन या हार्मोनची लेव्हल जास्त असते तसेच त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या देखील जास्त असते. परंतु याचा अर्थ व्यायामाचा अतिरेक करणे असा देखील होत नाही. प्रत्येकाने आपल्या तब्येतीला आणि वयाला झेपेल इतका व्यायाम करावा. त्यामध्ये सातत्य असणे मात्र आवश्यक आहे.
२) ताण तणाव आणि चिंता कमी करा: चिंता आणि ताण तणाव असेल तर स्वाभाविकच मनुष्याची कामेच्छा कमी होते. मानसिक बदलांचा शरीरातील ग्रंथी आणि हार्मोन्सवर देखील परिणाम होतो. त्यामुळे पुरूषांमधील पुनरुत्पादनाच्या क्षमतेवर देखील परिणाम होताना दिसून येतो. पुरुषांनी जाणीवपूर्वक आपल्यावरील ताण कमी करणे आणि एखाद्या गोष्टीचा अति विचार किंवा चिंता करणे कमी केले पाहिजे. यासाठी ध्यानधारणा, योगासने, योगमुद्रा यांचा उपयोग होताना दिसून येतो. विविध प्रकारच्या योगासनांमुळे शुक्राणूंच्या संख्येत नैसर्गिकरीत्या लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.
३) विटामिन सी मुबलक प्रमाणात असणारा आहार घ्या
या विषयावर झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरुषांच्या पुनरुत्पादनाच्या क्षमतेवर विटामिन सी मुळे चांगला परिणाम होताना दिसून येतो. विटामिन सी च्या गोळ्या घेण्याबरोबरच विटामिन सी मुबलक प्रमाणात असणारे अन्नपदार्थ जसे की संत्री मोसंबी लिंबू अशी फळे, मोड आलेली कडधान्य, ब्रोकली, स्ट्रॉबेरी, बटाटे यांचा आहारात नियमित समावेश करावा.
४) झिंक हा घटक पदार्थ असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा
आहारामध्ये पुरेशा प्रमाणात झिंक असणे हेदेखील पुरुषांच्या प्रजोत्पादनाच्या क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शरीरात जर झिंकची कमतरता असेल तर शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते. त्यामुळे मांस, अंडी, मासे, बेक्ड बिन्स या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
नैसर्गिक रित्त्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आहारात खाली पदार्थांचा समावेश करावा
अंडी, केळी, पालक, अक्रोड, अश्वगंधा, डाळिंब, अंजीर, मेथी, भोपळ्याच्या वाळलेल्या बिया, चॉकलेट, लसुण. हे सर्व पदार्थ झिंक, विटामीन सी, विटामीन डी, प्रोटीन आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असणारे आहेत. टोमॅटोचा रस, कलिंगड आणि काकडीचा रस हे पदार्थ देखील उपयोगी ठरतात. विटामिन डी, विटामिन सी भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ किंवा ह्या विटामीनच्या गोळ्या यांचे नियमित सेवन देखील नैसर्गिक रित्त्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत करते. शरीरातील शुक्राणूंची संख्या नैसर्गिक रित्त्या वाढविण्यासाठी तसेच आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश टाळावा.
खाली दिलेल्या वस्तू खाऊ नयेत…
१) जास्त प्रमाणात लाल मांस खाऊ नये.
२) सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पदार्थ खाऊ नयेत.
३) जंक फूड आणि साखरेचे सेवन कमीत कमी करावे.
४) पॅकबंद आणि प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
(सोशल मीडियावरून साभार)