सध्याच्या काळात अनियमित वातावरणामुळे व धकाधकीच्या जीवनात खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड , पिझ्झा , बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड . अशात विविध जंतू , विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे.
नेमकी रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याचा विचार करू. शरीरात कोणताही जंतूसंसर्ग, तसेच ऑलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. रोग प्रतिकार किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते.
प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात…
पहिला प्रकार म्हणजे निसर्गतः जन्मत: मिळणारी शक्ती. म्हणजेच शरिरात असणारा बोन मॅरो. हा रक्तातील जंतू किवा नको असलेल्या पेशी शोधून त्यावर रिअॅक्शन देत असतो.
दुसरा प्रकार म्हणजे अनुकूली प्रतिकारशक्ती (अॅडॉप्टिव्ह इम्युनिटी) ज्याला अधिग्रहित प्रतिकारशक्ती देखील म्हणतात, या प्रकारची प्रतिकारशक्ती कालांतराने विकसित होते आणि लसीकरणाद्वारे ती वाढवता येते.
प्रतिकारशक्ती कशी वाढवावी?
याचं सोपे उत्तर म्हणजे नैसर्गिक जीवन जगणं. नुसतंच काम न करता संपूर्ण पौष्टिक आहार, यात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. रोज एक फळ खाणं आवश्यक आहे. आहारामध्ये जंक फूड असलं तरी, आठवड्यातून अगदी एक किंवा दोन वेळाच. आहाराची वेळ निश्चित असावी. तसेच २४ तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरुन निघते. तसेच मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) साधारण राहतो.
अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात. खाऊन आलेली ऊर्जा खर्च करणं हे गरजेचं असत. २४ तासात एक तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची आहे. आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारांपेक्षा नैसर्गिकरित्या आजार टाळता आले पाहिजेत. हाच खरा मोठा उपाय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरनार नाही.