पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक…

आरोग्य

पपई हे फळ मुळातच आरोग्यवर्धक आहे. पपई खाण्याचे फायदे आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच उपयुक्त असतात. पपई म्हटलं की मऊसूत, गोडसर चवीची रसरशीत पपई आपल्याला आठवते. पपई हे फळं फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. खरंतर, पपई त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदानच ठरते. पपईत असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते, डाग कमी होतात, डेड स्किन निघून जाते आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज येते.

त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु या महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सऐवजी, पपईच्या सालींपासून – पानांपर्यंत, बियांपासून – गरापर्यंत पपईचा प्रत्येक भाग हा त्वचेवर एखाद्या जादू प्रमाणेच काम करतो. आतापर्यंत आपण पपईच्या गराचा वापर फेसमास्क, स्क्रब, फेसवॉश, फेसपॅकमध्ये केलेला पाहिला असेल, परंतु पपईच्या झाडाची पाने देखील त्वचेसाठी उत्तम मानली जातात.

पपईच्या पानांचा फेसमास्क कसा तयार करायचा

पपईच्या पानांचा फेसमास्क तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ पपईची ताजी पान, प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि बेसन आणि थोडे पाणी इतक्या तीन पदार्थांची गरज लागणार आहे.

पपईच्या पानांचा फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी, पपईच्या झाडांची ताजी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. या पानांचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये घालावेत. मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून ही पेस्ट वाटून घ्यावीत. मिक्सरमधील तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी, त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि बेसन घालून सगळे जिन्नस एकत्रित कालवून घ्यावेत. त्वचेवर लावण्यासाठी पपईच्या पानांचा फेसमास्क तयार आहे.

पपईच्या पानांचा फेसमास्क कसा वापरायचा 

पपईच्या पानांपासून तयार केलेला फेसमास्क चेहरा आणि मान यावर चांगल्या प्रकारे लावावा. मास्क लावल्यानंतर तो २० ते २५ मिनिटे तसेच ठेवावा. नंतर हलक्या हातांनी मसाज करत करत तो मास्क चेहऱ्यावरून काढावा. शेवटी पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुवून टाका. हा मास्क तुम्ही आठवड्यातून ३ वेळा लावू शकता. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ, मऊसूत आणि चमकदार दिसू लागेल.

पपईच्या पानांचा फेसमास्क वापरण्याचे फायदे… 

१) पपईच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ ठेवून मुरुमांचा त्रास कमी करतात.

२) पानांमध्ये असणारे एन्झाईम्स त्वचेवरील डेड स्किन हटवतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतात.

३) चेहऱ्यावरील काळे डाग, टॅन काढून त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होते.

४) यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता वाढवतात, ज्यामुळे वयोमानानुसार त्वचेवर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

५)पपईची पाने थंडावा देणारी असल्यामुळे त्वचेवरील लालसरपणा किंवा सूज कमी करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)