शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू असल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी या कामात दिवसभर पुर्णपणे व्यस्त होते. मात्र याच संधीचा फायदा घेत कान्हूर मेसाई परिसरात मुरुम माफियांनी अवैध उत्खननाचा सपाटा लावल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कान्हूर मेसाई आणि परिसरातील काही भागांमध्ये रात्रीच्या अंधारात तसेच पहाटेच्या सुमारास जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा केला जात आहे. उत्खननासाठी आवश्यक परवानग्या आहेत का…? उत्खननाची मर्यादा पाळली जात आहे का…? वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत का…? याची तपासणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
View this post on Instagram
अवैध मुरुम उत्खनन हा केवळ महसुली गुन्हा नसुन तो पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर विषय आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्खननामुळे नैसर्गिक भूभागाचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनींच्या लगत उत्खनन केल्याने जमिनीची धूप वाढत असून पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने माफियांचे मनोबल वाढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूल बुडवत काही जण लाखो रुपयांची कमाई करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाची नजर चुकवून किंवा काहींच्या आशीर्वादाने हा काळाबाजार सुरु आहे का…? असाही प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या अवैध व्यवसायाला खतपाणी घालत असल्याची टीका होत आहे.
तसेच भरधाव डंपरमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र या सर्व त्रासाकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत आरक्षण सोडतीसारखी महत्त्वाची प्रक्रिया सुरु असली तरी त्याचवेळी तालुक्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट सुरु असेल, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. एका बाजूला लोकशाही प्रक्रियेची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्यांचे फावते आहे, हे दुर्दैवी चित्र असल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करत आहेत.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला थेट काही सवाल उपस्थित केले आहे.
कान्हूर मेसाई परिसरातील उत्खननाची तपासणी कधी होणार…?
अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरांवर कारवाई का होत नाही…?
शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का…?
महसूल विभाग व्यस्त असताना मुरुम माफियांना अभय मिळाले आहे का…?
कान्हूर मेसाई परिसरातील कथित अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी एकच प्रश्न चर्चेत आहे. महसुल विभागाचे लक्ष आरक्षण सोडतीकडे असताना मुरुम माफियांच्या मुसक्या कोण आवळणार…?
शिरुर; आधी मुरुम चोरी नंतर तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन दमदाटी
अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन,महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत…?
शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी?
शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष