विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ ही एकात्मिक डिजिटल व्यवस्था सुरू केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवांसाठी एकाच व्यासपीठावर सुविधा उपलब्ध होणार असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सांगितले.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या परीक्षा, निकाल प्रक्रिया आणि उपकेंद्र स्थापन करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अभियांत्रिकी आणि फार्मसी विद्याशाखांतील उन्हाळी व हिवाळी सत्रांचे सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एका शैक्षणिक वर्षात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल प्रसिद्ध करून विद्यापीठाने ‘शून्य निकाल प्रलंबितता’ हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट गाठले आहे.

मंत्री पाटील म्हणाले की, परीक्षा दिल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण असतो. मात्र, वेळेत निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध होणार आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियोजन, ईआरपी प्रणालीतील सुधारणा आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे हे यश शक्य झाले आहे. सध्या केवळ ९६२ निकाल तांत्रिक कारणांमुळे तात्पुरते प्रलंबित असून संबंधित प्रक्रिया पूर्ण होताच ते जाहीर करण्यात येणार आहेत.

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक उत्तीर्णता नोंदविली असून सातव्या आणि आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४ ते ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे परीक्षा अर्ज, निकाल, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, पुनर्मूल्यांकन अर्ज तसेच तक्रार निवारण यांसारख्या सर्व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री पाटील यांनी विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम यांवर विशेष भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच निकाल प्रक्रियेतील उल्लेखनीय यशाबद्दल प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत