ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

महाराष्ट्र

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या ‘मंडल यात्रा’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसींची जातनिहाय जनगणना, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली.

भाजप ओबीसी समाजाची मते घेतो, मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी ओबीसी महामंडळाला अधिक निधी, महाज्योतीला किमान एक हजार कोटी रुपयांची तरतूद, महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी भवनासाठी निधी आणि ओबीसी प्रवर्गातील सुमारे एक लाख रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.

समृद्धी महामार्गाच्या विदर्भ विस्तारावरही त्यांनी आक्षेप घेतला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुपीक जमिनींचे बळजबरीने अधिग्रहण होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन संपादन थांबवावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभे राहील, असा इशारा त्यांनी दिला.

जंतर-मंतरवरील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत संघाच्या नेत्यांच्या कथित वक्तव्यांवर टीका करत, देशाच्या भविष्यासाठी लढणाऱ्या तरुणांचा अपमान करणे योग्य नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला मिळणाऱ्या वागणुकीचे ते वास्तव असल्याचे त्यांनी म्हटले.

नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कंत्राटी व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असून, कुंभमेळ्याच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप करत दर्जेदार कामे करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत