‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा

मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे देशभरातील लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजीनामा घ्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, ई-२० धोरण २०३० पासून लागू होणे अपेक्षित होते, मात्र काही हितसंबंधीयांना लाभ मिळावा म्हणून ते घाईघाईत लागू करण्यात आले. पेट्रोलमध्ये इथेनॉलऐवजी पाणी मिसळल्याच्या तक्रारी समोर येत असून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला पाहिजे, असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत, त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप केला. आरएसएसचा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल हे त्याचाच भाग असल्याचेही सपकाळ म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत