भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ झाला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सरकारवर जोरदार टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने काढली जात आहे. ओबीसी समाजाने संघटित होऊन आपल्या अधिकारांसाठी लढण्याची ताकद निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली. मात्र, सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा आरोप करत, दुसऱ्या टप्प्यात तो समाविष्ट केला जाईल, या सरकारी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओबीसी समाज सरकारसमोर झुकणार नाही, उलट सरकारलाच स्वतंत्र जातनिहाय जनगणनेचा कॉलम समाविष्ट करण्यास भाग पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच ही लढाई कोणत्याही पदापेक्षा मोठी असून आपण काँग्रेसचे नेते म्हणून नव्हे, तर ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून संघर्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारवर टीका करताना वडेट्टीवार यांनी ओबीसी महामंडळासाठी केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा आरोप केला. महाज्योती संस्थेसाठी किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी, तसेच प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याची मागणी त्यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे रखडल्या असून त्यामुळे लाखो पदे रिक्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. जातनिहाय जनगणना ही ओबीसी समाजाला शिक्षण, रोजगार, निधी आणि राजकीय प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळवून देण्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी या लढ्यात सर्व ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य समन्वयक उमेश कोराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ही मंडल यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे समारोप होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत