मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंडे व काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या, असा दावा चव्हाण यांनी केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंडे यांनी मंत्रीपदाची अट ठेवली होती. “मंत्रीपद मिळाले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रस्तावाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केला.
मात्र, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातील खासदाराला काँग्रेसमध्ये घेऊन थेट मंत्री करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर होऊ शकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत चव्हाण यांनी खंतही व्यक्त केली. “या प्रकरणात मी थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा न करता सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, याचा आजही पश्चाताप होतो,” असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांबाबतही चव्हाणांची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप यांच्यातील कथित जवळिकीबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. “शरद पवार यांचा पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, याची मला माहिती नाही,” असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनी काही खासदारांना सोबत घेऊन भेट घेतल्याबाबत विचारले असता, विरोधी पक्षातील खासदारांची कामे होत नसल्याने त्यांनी खासदारांना सोबत घेऊन भेट घेतली, यात काही गैर नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत सावध राहण्याचा इशारा
भाजपमध्ये गेलेल्या काही जुन्या सहकाऱ्यांचाही पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केला. “आमचे काही जुने सहकारी आता भाजपमध्ये आहेत. ते सांगतात की आम्ही ‘ऑपरेशन टायगर’ करून एक पक्ष फोडला आहे, दुसरा राहिला आहे, त्याकडे पाहा. त्यामुळेच मी सावध राहण्याचा इशारा दिला होता,” असे चव्हाण म्हणाले.