मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

महाराष्ट्र

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते. अनेकदा त्याच्यासोबत कुटुंबातील अन्य सदस्यही कचरा वेचताना दिसतात. मात्र, मुंबईच्या झोपडपट्टीत कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका आईने परिस्थितीसमोर हार मानली नाही. तिने आपल्या मुलाच्या हातात कचरा वेचण्याची गोणी देण्याऐवजी शिक्षणाची पुस्तकं दिली. याच पुस्तकांनी तिच्या मुलाचं आयुष्य बदललं आणि तो आज भारतीय वन सेवेतील (IFS) अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

ही प्रेरणादायी कहाणी आहे गौतम पाडीभर यांची. मुंबईच्या झोपडपट्टीतील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी IIT मद्रासमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर भारतीय वन सेवेत प्रवेश केला. सध्या ते छत्तीसगडमधील जगदलपूर येथील प्रसिद्ध कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

वडिलांचं छत्र हरपलं; आईने कष्टाची पराकाष्ठा केली

गौतम यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. लहान वयातच वडिलांचं छत्र हरपल्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. घर चालवण्यासाठी त्यांची आई सखूबाई पाडीभर यांनी मजुरीपासून कचरा वेचण्यापर्यंत मिळेल ते काम केलं.

सखूबाई स्वतः कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. मात्र, शिक्षणाचं महत्त्व त्यांना चांगलं ठाऊक होतं. घरात उपासमारीची वेळ आली, आर्थिक संकटं आली, स्वतःला गंभीर अपघात झाला, आजारपण आलं; मात्र मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी कधीही माघार घेतली नाही.आपल्या वाट्याला आलेली गरिबी मुलाच्या वाट्याला येऊ नये, हेच सखूबाईंचं स्वप्न होतं. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी गौतमच्या हातात कचऱ्याची गोणी नव्हे, तर पुस्तक दिलं.

जालना जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिक्षण

गौतम यांचं शालेय शिक्षण जालना जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात झालं. पुढे देशातील अनेक विद्यार्थी महागड्या कोचिंगच्या माध्यमातून IIT प्रवेशासाठी तयारी करत असताना गौतम यांनी मर्यादित साधनसुविधांमध्ये JEE परीक्षेची तयारी केली.त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि त्यांना IIT मद्रासमध्ये बीटेकच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी भारतीय वन सेवेत प्रवेश मिळवत आपल्या संघर्षाला यशाची नवी दिशा दिली.गौतम यांची 2023 च्या तुकडीतील छत्तीसगड केडरचे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

आई अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसली अन् क्षण झाला भावूक

गौतम पाडीभर यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांची आई सखूबाई त्यांच्या कार्यालयात पोहोचल्या तो प्रसंग. ज्या आईने आयुष्यभर कष्ट केले, त्याच आईला गौतम यांनी आपल्या अधिकृत खुर्चीवर बसवलं.

या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आई अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेली आणि तिच्या चेहऱ्यावर मुलाच्या यशाचा अभिमान दिसत असलेला हा क्षण अनेकांसाठी भावनिक ठरला.

या प्रसंगाबद्दल गौतम यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या यशामागची खरी ताकद सांगून जातात. “आज मी जे काही आहे, ते सर्व माझ्या आईमुळेच आहे. हे यश केवळ माझं नाही; त्याचं श्रेय सर्वप्रथम माझ्या आईला जातं,” असा आशय त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या रस्त्यांवर आणि पदपथांवर कचऱ्याच्या पिशव्या उचलणाऱ्या आईच्या हातांनी मुलाच्या भविष्यासाठी पुस्तकं निवडली आणि त्याच पुस्तकांनी गौतम यांना IITपासून भारतीय वन सेवेत पोहोचवलं. ही कहाणी केवळ एका मुलाच्या यशाची नाही; तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचं आयुष्य झोकून देणाऱ्या आईच्या त्यागाची आणि जिद्दीची कहाणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत