घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची ११ एकर शासकीय जमीन नवीन कारागृहासाठी सुपूर्द

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची सुमारे ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कुर्ला तालुक्यातील मौजे मानखुर्द येथील या जमिनीचा ताबा मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडे देण्यात आला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. ८ एप्रिल २०२६ रोजी एका दिवसात १२०० हून अधिक झोपड्या हटवून सुमारे ११ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानखुर्द येथील ही जमीन नवीन कारागृह उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गृह विभागातील अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) तसेच मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने या जागेची मागणी केली होती.

महसूल विभागाच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. राज्यातील वाढती कैद्यांची संख्या आणि विद्यमान कारागृहांवरील ताण लक्षात घेता नवीन कारागृह उभारणीचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत