पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र राजकीय

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात प्रभाव असलेले इंदुरी–वराळे गटातील दिग्गज नेते प्रशांत भागवत आणि त्यांच्या पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत उमेदवारीच्या राजकारणाला वेग आला असून, त्यातूनच हा राजीनामा राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून प्रशांत भागवत यांनी व्यापक तयारी केली होती. गटागटातील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, लोकसंपर्क वाढविणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक काम उभे केले होते.

इंदुरी–वराळे गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा सुटल्याने सौ. मेघा भागवत यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. स्थानिक कार्यकर्त्यांचा ठोस पाठिंबा, संघटनात्मक अनुभव आणि सामाजिक कामाची पार्श्वभूमी असूनही पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने असंतोष उफाळून आला.

राजीनाम्याची घोषणा करताना प्रशांत भागवत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना झोपते माप देण्यात आले. हा केवळ आमचा नव्हे, तर प्रत्येक कष्टाळू कार्यकर्त्यांचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर प्रशांत भागवत आणि सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी पक्षातील सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.