महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

महाराष्ट्र

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश पसरवावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमानंतर सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहातून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून ते राज्यभर नेण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाडची क्रांती ही लोकशाही आणि संविधानासाठी अत्यंत महत्त्वाची होती. लोकांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या विचारांना थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चौकटीत मर्यादित करू नये, ते संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान असल्याचे ठामपणे सांगितले. “शिवराय ते भिमराय” हा विचार सर्व समाजाने एकत्र येऊन पुढे नेण्याचे त्यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमाला सिद्धार्थ हत्तीअंबिरे, महेंद्र घरत, शाह आलम शेख, श्रद्धा ठाकूर, अमर खानापुरे, मार्तंड नाखवा, हनुमंत पवार, श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, शंभराव्या वर्षपूर्तीचा सोहळा अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.