उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

महाराष्ट्र

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी जनगणनेचे काम अनिवार्य करण्यात आले आहे. सुट्ट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

२०११ नंतर प्रथमच होत असलेल्या जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्याआधी एप्रिल अखेरपासून मेच्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता असून, जनगणना कामामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्या कालावधीची विशेष रजा दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे.घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे दिव्यांग शिक्षक संघटनांनी या कामातून सूट देण्याची मागणी केली असून, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहेत.