बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी केली. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
दौऱ्यात पार्थ पवार यांनी थेट कामांच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा आढावा घेतला. कामांची गुणवत्ता, निधीचा वापर, सुरक्षेचे निकष आणि ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण होणार का, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले. त्यांच्या नेमक्या व मुद्देसूद प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती सादर करावी लागली.
सुनेत्रा पवार यांचा ‘जनता दरबार’
दरम्यान, नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी शनिवारी (दि. १४) बारामतीत झंझावाती दौरा करत ‘जनता दरबार’ची परंपरा कायम ठेवली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बारामती व इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेऊन विकासकामांबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
विविध प्रकल्पांची पाहणी
पार्थ पवार यांनी फॉरेस्ट परिसरातील बटरफ्लाय गार्डन, ॲडव्हेंचर पार्क तसेच उभारणी सुरू असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाची पाहणी केली. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरावेत आणि बारामतीचा विकास वेगाने पुढे जावा, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
“अजितदादांचीच छबी”
पार्थ पवार यांच्या कामकाजातील बारकाई, थेट संवाद आणि निर्णयक्षमता पाहून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “अजितदादांचीच छबी” असल्याची भावना व्यक्त केली. बारामतीच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाला.
सहकार क्षेत्रावरही लक्ष
सुनेत्रा पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही आढावा घेतला. सहकार क्षेत्रातील कामकाजावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे संकेत देत आवश्यक तेथे कठोर निर्णय घेण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.बारामतीत विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी पवार कुटुंबीय सक्रिय झाल्याचे या सलग दौऱ्यांमधून दिसून येत आहे.