मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य कसे चालवायचे, आर्थिक घडी कशी बसवायची याचा दांडगा अनुभव असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण पवार कुटुंब शोकाकुल झाले असून, सुरुवातीला कुटुंब एकत्र दिसत होते.
मात्र, निधनानंतर अवघ्या काही तासांतच पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद उघडकीस आल्याचे चित्र आहे. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार या मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह मुंबईत दाखल झाल्या. सुनेत्रा पवार आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
Lया पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला.“सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत, याची मला कोणतीही माहिती नाही. आमच्यात याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,”असे स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी सांगितले.
या विधानानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे तातडीने मुंबईहून बारामतीला शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊनच पार्थ पवार बारामतीला गेले असल्याचे सांगितले जाते.बारामतीत शरद पवार, पार्थ पवार यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीला रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते, अशी माहिती आहे. बैठकीनंतर पार्थ पवार बाहेर आले असून ते आई सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर चर्चा करताना दिसले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दुसरीकडे, देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू असल्याचीही माहिती आहे.महत्त्वाचे म्हणजे, शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबतही मोठा दावा केला आहे.“दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती आणि १२ फेब्रुवारी रोजी त्याची अधिकृत घोषणा होणार होती,”असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.आता पार्थ पवार नेमकी काय भूमिका मांडतात, शपथविधी होतो का आणि पवार कुटुंबाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.