पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 28 जानेवारी) सकाळी अजित पवार मुंबई विमानतळावरून बारामतीकडे रवाना झाले होते.
VSR Venture प्रायव्हेट लिमिटेडच्या लियरजेट-45 XR या विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे अंगरक्षक विदिप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी प्रवास करत होते. हे विमान सकाळी सुमारे 8.45 ते 9 वाजेदरम्यान बारामती विमानतळावर उतरणार होते. मात्र, उतरण्याआधीच सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यासह देशभरात पसरली. या दुर्घटनेनंतर आता विमानाचा ब्लॅक बॉक्स डीजीसीएने आपल्या ताब्यात घेतला आहे. अपघातावेळी नेमके काय घडले, विमान कोसळण्यामागील कारणे काय होती, याचा शोध लवकरच लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या क्षणी कॉकपिटमधून “ओह शिट…” असे शेवटचे शब्द ऐकू आले होते. तसेच, बारामती विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलची जबाबदारी पायलट कॅडेट्सकडून सांभाळली जाते. यामध्ये शहरातील रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशन या दोन खासगी एव्हिएशन अकादमींचा समावेश असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने सोशल मीडियावर अधिकृत माहिती दिली आहे. बारामतीजवळ झालेल्या या दुर्दैवी अपघातानंतर सर्व तपास यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सखोल, पारदर्शक आणि कालबद्ध चौकशी करणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) दिल्ली येथील तीन अधिकारी आणि डीजीसीए, मुंबई प्रादेशिक कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचे पथक बुधवारीच अपघातस्थळी दाखल झाले. एएआयबीचे महासंचालकही घटनास्थळी पोहोचले असून तपास वेगाने सुरू आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MOCA) स्पष्ट केले आहे की, स्थापित मानक कार्यपद्धती (SOP) आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरावीक कालमर्यादेत तपास पूर्ण करण्यात येईल. एएआयबी नियम, 2025 मधील नियम 5 आणि 11 नुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विमान अपघातांची नेमकी कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा ठरतो. फ्लाइट रेकॉर्डर स्वरूपातील या उपकरणामध्ये उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहतो. स्फोट, आग, प्रचंड धडक, अतिउच्च तापमान किंवा पाण्यात बुडाल्यानंतरही हा डेटा सुरक्षित राहील, अशा प्रकारे ब्लॅक बॉक्सची रचना केलेली असते. त्यामुळे अपघाताची कारणे उलगडण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ब्लॅक बॉक्सची भूमिका निर्णायक मानली जाते.