राजकीय वाटचालीत अपार यश! पण अजित पवारांच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच नियतीचा घाला

महाराष्ट्र

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज, स्पष्टवक्ता आणि कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अनेक कार्यकर्त्यांना संधी देत त्यांनी त्यांना घडवले, तर हजारो लोकांची कामे मार्गी लावून अनेकांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली. प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती.

अजित पवार यांचेही काही स्वप्ने होती. त्यातील सर्वात मोठे स्वप्न म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे. मुख्यमंत्रीपदाची संधी वारंवार हुलकावणी देत राहिली, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. 2004 साली संधी जवळ येऊनही मुख्यमंत्रिपदाचा मान काँग्रेसकडे गेला, मात्र उपमुख्यमंत्रिपदावर त्यांनी आपला ठसा उमटवला. राज्यात मुख्यमंत्री बदलत गेले, पण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची भूमिका सातत्याने केंद्रस्थानी राहिली.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुभंगलेले दोन गट एकत्र आणण्याचे स्वप्नही अजित पवार पाहत होते. पक्षात फूट पडली असली, तरी कुटुंबातील नातेसंबंध कायम ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुणे-पिंपरीसह काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. मात्र हे मनोमिलन पूर्णत्वास जाण्याआधीच त्यांचे निधन झाले आणि हे स्वप्नही अपूर्णच राहिले.

अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, अभ्यासू आणि प्रभावी नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, अशीच भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.