घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार 

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली.

“तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधीच मिळालेला नाही. अनेकांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरांची बांधकामे सुरू केली; परंतु हप्ते न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत.

“सरकारकडून प्रत्येकवेळी ‘लवकरच निधी देऊ’ असे उत्तर दिले जाते. पण हा ‘लवकर’ नेमका कधी येणार?” असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

“तीन पावसाळे कसे काढले?”

तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी सलग तीन पावसाळे कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का? हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारकडून ठोस भूमिका मागितली.

विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

घरकुल योजनेबाबतच्या या चर्चेची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याबाबत सविस्तर माहिती घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण अहवाल सभागृहासमोर सादर करावा, असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.

घरकुल योजनेतील निधीविषयक प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली असून, आता सरकारकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.