शिरुर (रुपाली खिलारी) शिरुर येथे रामलिंग रस्त्यावर आजपासुन दि. २४ ते २ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक प.पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून श्री शिव महापुराण कथेचे दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कथास्थळी आकर्षक मंडप, बसण्याची उत्तम व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. या पवित्र कथेचा लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी केले आहे.
पं. प्रदीप मिश्रा हे आपल्या ओजस्वी वाणी, सुलभ भाषाशैली आणि प्रभावी निरुपणासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांमधून शिवभक्ती, सदाचार, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. त्यामुळे त्यांच्या कथेसाठी विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
श्री शिव महापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधनाचा प्रभावी माध्यम आहे. या कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक उन्नती, मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा धार्मिक कार्यक्रमांची समाजाला नितांत गरज आहे,’ असे आयोजकांनी सांगितले.
आज मंगळवार (दि २४) रोजी दुपारी १ च्या सुमारास मोठया उत्साहात या धार्मिक सोहळ्याची सुरवात झाली. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुले उपस्थित होती. शिरुर शहर, पंचक्रोशी तसेच शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातुन भाविकांची मोठी उपस्थिती होती.
एक लोटा जल हर समस्या का हल” हा उपाय सांगणारे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्यांची वक्तव्ये, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंडित प्रदीप मिश्रा हे शिव महापुराणाची कथा सांगतात. त्यांच्या कथेत लाखो भाविकांची उपस्थिती असते. कथेसोबतच ते लहान लहान उपाय सांगतात. हे उपाय लोकांना खूपच आवडतात. तसेच त्यांच्या वतीने रुद्राक्ष वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या रुद्राक्षात भाविकांची अतूट अशी श्रद्धा आहे.
सीहोर जिल्ह्यात पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुंडेश्वर धाम तयार केला. याठिकाणी देशभरातून भाविक येतात. इतकेच नव्हे तर परदेशातूनही लोक याठिकाणी येतात आणि रुद्राक्ष घेतात. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुंडेश्वर धाम याठिकाणी मिळणाऱ्या रुद्राक्षबाबत भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. कुंडेश्वर धामचे दर्शन करण्यासाठी लाखों भाविक भक्त याठिकाणी कायम येत असतात. पंडित प्रदीप मिश्रा यांना विनय मिश्रा आणि दीपक मिश्रा असे दोन भाऊ आहेत. तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. तसेच त्यांना राघव आणि माधव अशी दोन मुले आहेत. त्यांच्या कथेला अनेक मंत्रीही हजेरी लावतात.
त्यांनी सीहोर येथून शालेय आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. शालेय कालावधी दरम्यानच त्यांची धर्म-अध्यात्म याकडे आवड निर्माण झाली होती. या कारणामुळेच ते शाळेतही भजन गायचे. किर्तन करायचे. पदवीच्या शिक्षणादरम्यान, त्यांनी धर्मशास्त्राचा खोल अभ्यास केला.
सीहोर वाले बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले पंडित प्रदीप मिश्रा यांना त्यांच्या परिचयाची ब्राह्मण कुटुंबातील एक महिला गीताबाई पाराशर यांनी गुरू दीक्षेसाठी इंदूर येथे पाठवले. याठिकाणी पंडित प्रदीप मिश्रा यांनी विठलेश राय काका यांना आपले गुरू मानले. प्रदीप मिश्रा यांनी दीक्षा घेऊन शिव मंदिरातून कथावाचन सुरू केले. त्यांनी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा कथा केली. शिव महापुराण कथेबाबत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.