मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन २० हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ मधील तरतुदींनुसार विद्यमान विधानमंडळ सदस्यांना प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी स्वीय सहाय्यकांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
विधानमंडळ सदस्यांच्या वेतन व भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार स्वीय सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने स्वीय सहाय्यकांसह वाहनचालकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे विधानमंडळ सदस्यांच्या कार्यालयीन आणि प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत स्वीय सहाय्यक तसेच वाहनचालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.