शहरांच्या बकालपणाला सरकारच जबाबदार; काँग्रेसचा ‘शहर परिवर्तन गट’ २० ऑगस्टपासून मैदानात

महाराष्ट्र

मुंबई: राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सरकार व महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यातील अनेक शहरे बकाल होत असून नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे.

शहर विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला, तरी शहरांच्या मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत, असा दावा काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांच्या गरजा समजून घेऊन नियोजनबद्ध विकासासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन केला आहे.

या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांत करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पत्रकार परिषदा घेण्यात येणार असून, यावेळी ‘शहर परिवर्तन गटाच्या’ आगामी कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.

या गटाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, तेलंगणाचे सहप्रभारी आणि वरिष्ठ प्रवक्ते सचिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संग्राम खोपडे यांच्याकडे गटाच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शहरांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपाययोजना सुचवणे आणि शहर विकासासाठी ठोस पर्याय मांडणे, या उद्देशाने ‘शहर परिवर्तन गट’ काम करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत