कोल्हापूर: काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर खाण व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच खाण व्यवसायिकांनी रॉयल्टी न भरता हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिल्यानंतर कोल्हापूर शेजारील खाण व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही. आम्ही सर्व व्यवसाय कायदेशीर केलेले आहेत. केवळ खाण व्यवसायिक नव्हे तर मुंबई गोवा, रत्नागिरी, नागपूर रोडवरील अनेक कामे माझी चालू आहेत. आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेतले. कोणाला लुबाडून घेतले नाही. आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेऊ नये का? असा सवाल शिवाजी पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. हेलिकॉप्टर घेतले म्हणजे कोणाला वाईट वाटू नये. ते घेण्यासाठी आम्ही बँकेकडून दहा कोटीचे कर्ज घेतल्या टोलाही पोवार यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले सतेज पाटील?
खाणकाम केल्यानंतर रॉयल्टी भरली का नाही? याची माहिती घेतली पाहिजे. हा प्रश्न उपस्थित करताना कोल्हापुरातील शिये येथील गट नंबर 144 चे उदाहरण दिले. खाणीतून चार लाख ब्रास इतके क्रशिंग काढले हे तहसीलदारांच्या आकडेवारीवरून समोर येते. मात्र दबावाने 96 हजार क्रशिंग वरच ते मिटवण्यात आले. त्यामुळे जवळजवळ 100 कोटीची रॉयल्टी विकली अशा बातम्या वर्तमानपत्रात आले आहेत. ज्यांनी रॉयल्टी घेतली त्यांनी हेलिकॉप्टर घेतले अशा देखील चर्चा आहेत, असे विधान परिषदेत सतेज पाटील म्हणाले.
खाण घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला यातून किती पैसे मिळायला हवे होते. हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र या खाणी बंद करत असताना जुनी रॉयल्टी वसूल झाली आहे की नाही? याचा विचार करणे सरकारची गरज आहे. चार लाख ब्रास क्रशरिंग करून सुद्धा नोटिसा निघून सुद्धा रॉयल्टी वसूल होत नसेल, दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर घेत असेल, त्यामुळे विभाग नेमका काय करतोय हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. असे देखील सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान सतेज पाटलांच्या या प्रश्नानंतर कोल्हापूर आणि परिसरात महसूल विभागांकडून अशा खाणींवर कारवाईची धडक मोहीम हातात घेण्यात आली. यामध्ये काही खाणी सील देखील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.