आई-वडिलांकडे दिलेली चिठ्ठी; ४ महिने खात्यातून पैसेही काढले नाह
दिल्ली: दिल्लीत सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गीता कॉलनीत फ्लायओव्हरजवळ आढळून आलाय. स्नेहा देवनाथ असं तरुणीचं नाव असून ती त्रिपुराची होती. दिल्ली विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्या जवळच्या मित्रांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. ७ जुलै रोजी स्नेहा पर्यावरण कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाली होती.
स्नेहा देवनाथ हिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. तिच्या कुटुंबियांनी एक चिठ्ठी पोलिसांकडे दिली आहे. यात सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारणार असल्याचा उल्लेख आहे. तसंच तिच्या पालकांनी अशीही माहिती दिली की गेल्या चार महिन्यांपासून तिने खात्यावरून एक रुपयासुद्धा काढला नव्हता.
तरुणी बेपत्ता झाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू होता. पोलिसांनी स्नेहाला सिग्नेचर ब्रिजवर सोडणाऱ्या कॅब चालकाची चौकशी केली. त्यानंतर तिचं शेवटचं लोकेशन तपासलं असता ते सिग्नेचर ब्रिजवरच होतं. पोलिसांनी सिग्नेचर ब्रिजवर काही प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. त्यात तरुणीला तिथं पाहिल्याचं काहींनी म्हटलं. एनडीआरएफच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहिम राबवली असता गीता कॉलनीच्या फ्लायओव्हरजवळ तिचा मृतदेह आढळून आला.
स्नेहाच्या जवळच्या मित्रांनी ती गेल्या काही महिन्यांपासून टेन्शनमध्ये होती असं सांगितलं. तिनं ७ जुलै रोजी सकाळी ईमेल आणि व्हॉटसअप मेसेजही पाठवले होते. स्नेहाने तिच्या हाताने लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे. त्यात तिनं यमुना नदीवर असणाऱ्या पुलावरून उडी मारण्याचा इशारा दिला होता.
सिग्नेचर ब्रिजवर जिथं स्नेहाचं शेवटचं लोकेशन होतं तिथं सीसीटीव्ही कॅमेरे चालू नव्हते. हा ब्रिज ४-५ वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या पोलीस ठाण्यांनी त्यांचे कॅमेरे इथं लावले आहेत. पण एकही चालू नाही असं स्नेहाच्या मित्रांनी म्हटलंय.