अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

प्रशासन अशोक भोरडे यांच्या हत्येची वाट पाहत आहे का?

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील आरटीआय व व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, अशोक भोरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन, अनधिकृत प्लॉटिंग व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या तक्रारींमुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला असून, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या व निलंबनाच्या कारवाया देखील झाल्या आहेत.

अशोक भोरडे यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर राहुल करपे व इतरांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या राहुल करपे याने तहसील कार्यालयातच भोरडे यांना उद्देशून म्हणाला की कोणी ….. उठून येतील अन् आमच्या प्लॉटिंगची तक्रार करणार का आम्ही आठ आठ दहा-दहा कोटी रुपये गुंतवले आहेत. मोठ्याने शिवीगाळ, दमदाटी केली आणि “आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो,” असे धमकावल्याची फिर्याद भोरडे यांनी दिली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप देखील उपलब्ध आहे.

अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ अंतर्गत राहुल करपे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार बाळासो म्हस्के यांच्या समक्ष घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कोट्यवधींचा दंड आणि अनधिकृत प्लॉटिंग

भोरडे यांच्या तक्रारीमुळे राहुल करपे ला लाखो रुपयाचा दंड

निमगाव म्हाळुंगी येथील अनधिकृत गौण खनिज वापर केल्याप्रकरणी राहुल करपे व इतरांना २०,६५,१०५ रुपये दंडाची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. तसेच १३,६८८ रुपये अधिक ३,४८,१३५ रुपयांचा दंड करण्यात आला असुन शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील अनाधिकृत गौण खनिज वापर केल्याने शिरूर तहसीलदार यांनी २३,६५,१०५ रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

राहुल करपे यांच्याविरुद्ध आधीपासूनच गुन्हे

भोरडे यांनी सांगितले की, राहुल करपे याच्याविरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. भोरडे यांच्या जिवाला धोका असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी त्यांना चार वर्षे पोलिस संरक्षण दिले होते.

प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह

भोरडे यांच्या जीवितास व मालमत्तेस धोका असल्याचे पोलिस प्रशासनाला माहिती असतानाही पोलिस अटकपूर्व जामिनासाठी संधी देणार का? की तत्काळ अटक करणार? या प्रश्नाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दीपक कारांडे करत आहेत.

अशोक भोरडे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत मी प्रशासनातील गैरव्यवहार उघड केला आहे. त्यामुळे काही लोक दुखावले गेले आहेत. माझ्या जिवाला धोका असून, पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे का? शिरूर तालुक्यात चर्चेत असलेला प्रश्न असा की, “चळवळीतील कार्यकर्त्यांची हत्या व्हावी आणि अवैध धंदे अबाधित राहावेत, हाच पोलिस प्रशासनाचा उद्देश आहे का?” असा संतप्त सवाल शिरूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

(क्रमश:)