पत्नीचा खून करून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाचा मृतदेह आढळला

क्राईम महाराष्ट्र

पुणे : पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून 17 वर्षीय मुलावर चाकूहल्ला केल्याच्या प्रकरणातील माजी सैनिकाचा मृतदेह भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर दुसऱ्या घटनेत पिंपरी-चिंचवडमध्ये तडीपार असलेल्या सराईत गुंडाने स्वतःच्या दिव्यांग पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पत्नीचा खून, मुलावर चाकूहल्ला; आरोपी माजी सैनिकाचा मृतदेह नदीकाठी

राजगुरुनगर येथील घरात माजी सैनिक महेंद्र दौंडकर यांनी पत्नी दीपा हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या 17 वर्षीय मुलगा अथर्व याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

या घटनेनंतर महेंद्र दौंडकर बेपत्ता झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. नदीकाठच्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, दौंडकर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे पाऊल उचलले, याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हेगारीची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रेकॉर्डवरील आणि तडीपार असलेल्या एका गुंडाने आपल्या दुसऱ्या दिव्यांग पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.

आरोपीने महिलेचे केस कापून तिला विद्रुप केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक स्वरूपाचे गंभीर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तडीपार असताना आरोपी शहरात आला कसा?

या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तडीपार असतानाही आरोपी पिंपरी-चिंचवड शहरात कसा वावरत होता? त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काय कारवाई झाली? तसेच पीडित महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनुसार पोलिसांनी कोणकोणती कलमे लावली आहेत, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

दिव्यांग महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत