‘आशीर्वादाचा दिवा’ नव्हे, मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

महाराष्ट्र

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या उपक्रमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे.

“नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी मोठा दिवस असेल; पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ लावले, म्हणून त्यांच्या वाढदिवशी दिवे लावायचे? नरेंद्र मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’ आहे,” असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.

जनता महागाईने त्रस्त आहे, लाखो तरुण बेरोजगारीच्या संकटात आहेत, शेतकरी अडचणीत आहे, विद्यार्थी पेपरफुटीने हैराण आहेत, तर छोटे-मध्यम व्यापारी करांच्या ओझ्याने त्रस्त आहेत, असा दावा सपकाळ यांनी केला. “समाजातील एकही घटक मोदी सरकारच्या कामावर समाधानी नाही, मग वाढदिवस कसला साजरा करता?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोदी सरकारच्या कार्यकाळात देश २५ वर्षे मागे गेला असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, “मोदींचा कार्यकाळ हा सर्वात वाईट कार्यकाळ ठरला आहे. देशावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. चीनच्या मुद्द्यावर मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसते. समाजात हिंदू-मुस्लिमच्या नावावर विभाजन निर्माण करण्याचे काम झाले आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. फक्त फेकाफेकी करणे हीच त्यांची कामगिरी आहे.”

तातडीने दुष्काळ जाहीर करा’

राज्यातील अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, असा दावा सपकाळ यांनी केला.

“शेतातील पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिलेले नाही. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत करावी. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होत आहे; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही. सरकारची मदत काय शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर मिळणार आहे का?” असा सवाल त्यांनी केला.कर्जमाफीची घोषणाही फसवी ठरल्याचा आरोप करत सरकारने ‘अभ्यास’ करण्यात वेळ न घालवता तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

फडणवीसांनी काँग्रेसला सल्ले देऊ नयेत’

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना आणखी कोणती जबाबदारी द्यायची, हे काँग्रेस पक्ष ठरवेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची गरज नाही, असे सपकाळ म्हणाले.“नरेंद्र मोदी आणि अमित शाह भाजपमध्ये कोणालाही काम करू देत नाहीत, कोणाला बोलूही देत नाहीत. त्यामुळे फडणवीसांनी भाजपची चिंता करावी आणि काँग्रेसला सल्ले देणे बंद करावे,” असे प्रत्युत्तर सपकाळ यांनी दिले.

मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका आडमुठी : सपकाळ

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका आडमुठी असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. “एक आंदोलन दीर्घकाळापासून सुरू आहे. सर्व समाजाशी संवाद साधण्याची जबाबदारी सरकारची आहे; मात्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. आरक्षण टिकवून ठेवण्याची जबाबदारीही सरकारची होती,” असे ते म्हणाले.मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली आश्वासने काय होती, ती जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली. जातीनिहाय जनगणनेत जातीचा स्वतंत्र कॉलम असावा आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

UPI वर कर’च्या आरोपावरूनही सरकारवर निशाणा

UPI व्यवहारांबाबतच्या नव्या शुल्क व्यवस्थेवरूनही सपकाळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “सरकार आधी ऑनलाइन व्यवहार करा, असे सांगत होते आणि आता त्याच व्यवहारांवर शुल्क लावण्याची वेळ आली आहे. अमेरिकेच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

मात्र, केंद्र सरकारने UPI वरील नव्या व्यवस्थेला ‘कर’ नसल्याचे स्पष्ट केले आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे. व्यक्ती-व्यक्ती (P2P) व्यवहार आणि ₹२,००० पर्यंतचे व्यापारी व्यवहार शुल्कमुक्त राहतील. सरकारच्या म्हणण्यानुसार MDR हा सरकारकडून वसूल केला जाणारा कर नसून पेमेंट इकोसिस्टममधील सहभागी संस्थांमध्ये वितरित होणारे शुल्क आहे. “ऑनलाइन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू करू नये,” अशी मागणी सपकाळ यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत