मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि वादळाचा फटका बसला. मात्र, पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर मागे वळवून जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे हे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी मुंबईहून मुरबाडकडे रवाना झाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. हेलिकॉप्टर ऐरोली परिसरात पोहोचताच समोरून तीव्र वादळी परिस्थिती असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले.
संभाव्य धोका लक्षात घेऊन पायलटने तातडीने उपमुख्यमंत्री शिंदे यांना परिस्थितीची माहिती दिली आणि पुढे जाणे धोकादायक ठरू शकते, असे सांगितले. त्यानंतर तत्काळ हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही मिनिटांतच हेलिकॉप्टरचे जुहू येथील पवनहंस येथे यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक आणि विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरक्षित लँडिंगनंतर सर्वजण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी रवाना झाले.