रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये गेल्या अवघ्या सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या तीन घटनांनंतरही अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पहिली घटना २४ जानेवारी २०२६ रोजी पी. व्ही. सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घडली. कंपनीच्या आवारात बांधकाम सुरु असताना भिंत अंगावर कोसल्यामुळे अजित अर्जुन चौरे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का…? धोकादायक परिसर सुरक्षित करण्यात आला होता का आणि कामगारांच्या जीविताच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

या घटनेला तीन महिनेही पुर्ण होत नाहीत तोच २४ एप्रिल २०२६ रोजी ट्रान्सपिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दुसरी जीवघेणी दुर्घटना घडली. कंपनीच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम करत असताना अमोल विष्णु ढाळस्कर (वय ३६) यांचा उंचावरुन खाली पडून मृत्यू झाला. उंचावर काम करताना सुरक्षा बेल्ट, हार्नेस, लाइफलाइन अथवा अन्य आवश्यक संरक्षक साधने वापरण्यात आली होती का, याबाबत सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.

त्यानंतर १९ जुलै २०२६ रोजी ब्रिटानिया कंपनीमध्ये तिसरी दुर्घटना घडली. कंपनीच्या आवारात दिलीप आत्माराम राठोड (वय ३४) यांचा टेम्पोखाली आल्याने मृत्यू झाला. कंपनी परिसरातील अवजड तसेच मालवाहू वाहनांच्या हालचालीसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था, वाहन रिव्हर्स घेताना मार्गदर्शक कर्मचारी, सुरक्षा सूचना आणि नियंत्रण यंत्रणा होती का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुर्घटना झाल्यावर पंचनामा आणि चौकशी पुरेशी आहे का…?

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्घटनांत तीन कामगारांचे जीव जाणे ही गंभीर बाब आहे. प्रत्येक घटनेनंतर चौकशी होत असेल; मात्र पुढील दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये सुरक्षा ऑडिट, अचानक तपासण्या, धोकादायक कामांची पडताळणी आणि कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची तपासणी कितपत होते, याचे उत्तर औद्योगिक सुरक्षा विभागाने देण्याची गरज आहे.

कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर केवळ कागदोपत्री कारवाई करुन प्रश्न संपत नाही. दुर्घटना होण्यापुर्वी ती टाळणे हीच खरी औद्योगिक सुरक्षा व्यवस्था. त्यामुळे रांजणगाव MIDC मधील सर्व कंपन्यांची नियमित तपासणी किती वेळा झाली, कोणकोणत्या त्रुटी निदर्शनास आल्या, त्यावर काय कारवाई करण्यात आली आणि संबंधित कंपन्यांना कोणत्या सूचना अथवा नोटिसा देण्यात आल्या, याची माहिती कामगारांना मिळणे आवश्यक आहे.

कामगारांचा जीव एवढा स्वस्त आहे का…?

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करतात. उत्पादनाचे उद्दिष्ट, वेळेचे बंधन आणि आर्थिक व्यवहार यांच्या गर्दीत कामगारांची सुरक्षितता दुय्यम ठरत असेल तर ही बाब गंभीर आहे. आता औद्योगिक सुरक्षा विभागाने या तीनही घटनांची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करुन संबंधित कंपन्यांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन झाले की नाही हे स्पष्ट करावे. तसेच संपुर्ण रांजणगाव MIDC मध्ये विशेष औद्योगिक सुरक्षा तपासणी मोहीम राबवून दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी केली आहे.

ब्रिटानिया कंपनीने मृत कामगाराच्या पत्नीला दिली नोकरी…

रांजणगाव MIDC मध्ये ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पो आणि रॅम्पच्या दरम्यान अपघात झाल्याने चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि १९) जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मृत चालकाच्या पत्नीला १४ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कंपनीत कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे. परंतु इतर दोन घटनांमध्ये मात्र ट्रान्सपिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पी. व्ही. सन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीत घडलेल्या घटनेबाबत दोन्ही कामगारांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबियांना कंपनी प्रशासनाने काय मदत केली याची खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत