जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करण्याचा संकल्प; एमआयडीसी, आयटी पार्क व पायाभूत सुविधांचे आश्वासन
जुन्नर: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे भाग्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी जुन्नर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती.
जुन्नर ही संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी असलेली, वारकरी संप्रदायाला “राम कृष्ण हरी” हा मंत्र देणारी आणि शिवनेरीसारखी पराक्रमाची भूमी असून ही भूमी मंदिराइतकी पवित्र आहे, असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून, कठीण काळात नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्नर नगरपालिकेवर भगवा फडकवला आणि विधानसभेत महायुतीला २३२ जागांचे ऐतिहासिक यश मिळाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींचे मोफत उच्च शिक्षण, नावासमोर आईचे नाव, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विम्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढ अशा विविध लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी आढावा घेतला. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
जुन्नर तालुक्यातील बिबट्या दहशतीवर उपाय म्हणून दोन रेस्क्यू सेंटर उभारण्याचा कॅबिनेट निर्णय घेतल्याचे सांगून, बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवनेरी पायथ्याशी एमआयडीसी व आयटी पार्क, भव्य प्रवेशद्वार, डुंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क तसेच पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
मुरबाड–जुन्नर महामार्ग, पुणे–नाशिक रेल्वेला गती, जुन्नर–तळेगाव रस्ता, चिलेवाडी धरण दुरुस्ती, पूल बांधकाम, पारुंडे कुंभमेळा सुविधा, आदिवासी वाड्यांसाठी पाणी योजना आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई पॅकेज यासह विविध विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला.
“शेतकरी हा अन्नदाता असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार त्याचाच आहे,” असे सांगत ओतूर व नारायणगाव नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सुरू करू, तसेच स्थानिक युवकांना पर्यटनातून रोजगार देण्यावर भर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व शिवसेना उमेदवारांची नावे जाहीर करून ७ तारखेला धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत “धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत” असा संदेश त्यांनी दिला.
“जुन्नरचा कायापालट करून शिवभूमीचे ऋण फेडू,” असा शब्द देत त्यांनी जय महाराष्ट्रच्या घोषणेत भाषणाचा समारोप केला.यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, आमदार शरद सोनावणे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.