मुंबई: संत परंपरेने समृद्ध महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या ‘मूळ पादुका’ नेण्याच्या मागणीवर विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सविस्तर चर्चा झाली.सभागृहात विविध सदस्यांनी आपापली मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
योगेश टिळेकर यांची लक्षवेधी
लक्षवेधी क्र. २ द्वारे सदस्य योगेश टिळेकर यांनी अरण येथे होणाऱ्या संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर मार्फत पांडुरंगाच्या मूळ पादुका आणण्याची मागणी मांडली.वारकरी संप्रदायाच्या भावना आणि संत परंपरेतील अध्यात्मिक संदर्भ लक्षात घेऊन समितीने आवश्यक तरतुदींमध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित न्यासच्या कामकाजाबाबत तक्रारींची चौकशी करून आवश्यक असल्यास प्रशासक नेमावा, अशी मागणीही करण्यात आली.
‘अरणला मूळ पादुका नेण्याची परंपरा नाही’ – आशिष जयस्वाल
उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले की अरण येथे मूळ पादुका नेण्याची परंपरा अस्तित्वात नाही. सुमारे दीडशे वर्षांपासून स्थानिक परंपरेनुसार इतर पादुकांची पालखी जाते.२०१४ पासून पंढरपूर ते आळंदी दरम्यान मूळ पादुका नेण्याची प्रथा सुरू झाली आहे; मात्र अरण संदर्भात अंतिम निर्णय संबंधित न्यासाच्या बैठकीत घेतला जाईल. तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अमोल मिटकरी यांची भूमिका
चर्चेत सहभागी होताना सदस्य अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच मंदिर समिती व न्यासाच्या मुदतवाढ आणि कार्यपद्धतीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
सर्वसंमतीचा मार्ग स्वीकारण्याचे निर्देश
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संत परंपरा, वारकरी समाजाच्या भावना आणि कायदेशीर बाबी यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे नमूद केले. न्यासातील अनेक सदस्यांची कालमर्यादा संपल्याने सध्याच्या स्थितीत निर्णय प्रक्रियेत अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यासाची सद्यस्थिती आणि संभाव्य मतभेद लक्षात घेता सर्व संबंधित घटक, परंपरा अभ्यासक, वारकरी प्रतिनिधी आणि कायदेविषयक तज्ज्ञ यांची बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. समाधी सोहळ्यापूर्वी निर्णय व्हावा, असेही सभागृहातून सुचविण्यात आले. या चर्चेमुळे संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अरण येथील धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाच्या भावना आणि मंदिर समितीच्या अधिकारक्षेत्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.