वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

क्राईम महाराष्ट्र

वाघोली: अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत 28 लाख रुपये किंमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रोन, मोटार आणि मोबाईल असा एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किशन नंदकिशोर लधड (वय 35, रा. धानोरी) आणि हनुमान रूपाराम चौधरी (वय 33, रा. वडगाव मावळ) अशी आहेत. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर रस्त्यावरील केसनंद भागात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या किशन लधड याला वाघोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पुढील तपासात वडगाव मावळ येथील तस्कर हनुमान चौधरी याने त्याला मेफेड्रोन पुरविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वडगाव मावळ परिसरात सापळा लावून चौधरीला ताब्यात घेतले.

चौधरीच्या मोटारीतून 28 लाख रुपये किंमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. हे दोघेही मूळचे राजस्थान येथील असून, चौधरी राजस्थानातून मेफेड्रोन आणून शहरात विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मागील वर्षभरापासून शहरात या ड्रग्सची तस्करी सुरू असल्याचेही उघड झाले आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक अमोल काळे, प्रदीप मोरे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड आणि मारुती वाघमारे यांच्या पथकाने केली.दरम्यान, या प्रकरणातील ड्रग्स पुरवठा साखळीचा अधिक तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.