मर्डर मिस्ट्रीने सजलेला ‘तलास’; गौतमी पाटीलच्या धम्माल गाण्याची रंगतदार एन्ट्री

मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांची परंपरा कायम राखत रहस्य आणि रोमांचाचा संगम घडवणारा ‘तलास’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शीर्षकावरून कथानकाचा अंदाज न लागणारा हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो.

निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, तर संवादलेखन रुपाली कुटे यांनी केलं आहे. गीतकार विजय गाडेकर यांनी गीतलेखनासोबत संगीत दिग्दर्शनही केलं आहे.

दादर क्लबमध्ये गाण्याचा जल्लोषात प्रकाशन सोहळा

तलास या चित्रपटातील ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा दादर क्लब येथे दिमाखात पार पडला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं, रॉयल आणि ग्लॅमरस अंदाजात सादर झालेलं हे गीत उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवत ठरलं.या गाण्यावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी ठेका धरला असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केलं आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या खास आवाजात हे गाणं सादर केलं आहे.

दमदार स्टारकास्ट आणि तांत्रिक टीम

चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

डिओपी सचिन लोखंडे यांची प्रभावी सिनेमॅटोग्राफी, कलादिग्दर्शन अनिल केदार, वेशभूषा धनश्री सालेकर, रंगभूषा सुनील सावंत, छायाचित्रण पंकज पटेल, पोस्ट प्रॉडक्शन संमित स्टूडियो, संकलन सुबोध नारकर, ध्वनीआरेखन विशाल राणे, कार्यकारी निर्माता सदानंद टेंबुलकर, निर्मिती व्यवस्थापक संदीप मोरे आणि डीआय कलरिस्ट भूषण दळवी अशी भक्कम तांत्रिक फळी या चित्रपटामागे कार्यरत आहे.रहस्य, थरार आणि जल्लोषाचा मिलाफ असलेला ‘तलास’ प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.