जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा..

महाराष्ट्र

औरंगाबाद: मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे.

लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओंची उपस्थिती होती. शिक्षण, आरोग्य, सामाजिक वनीकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अध्ययन स्तर शोधल्यावर उपाय करण्याचा डाटा समोर येईल. त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षित करून अपडेट करण्यात येईल.

मराठवाड्यात ८ ते १० हजार जि. प. शाळा

ऑगस्ट २०२२ मध्ये लातूर जि. प.ने गुणवत्तावाढीसाठी प्रयोग केला होता. तो प्रयोग मराठवाड्यातील ८ ते १० हजार जि. प. शाळा व ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर पूर्ण विभागात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.