आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 तसेच त्याअंतर्गत ‘शेड्युल टी’मधील गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यभरातील 434 परवानाधारक आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत उत्पादन परिसराची स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण विभाग, औषधांच्या चाचणीच्या नोंदी, एसओपी तसेच उत्पादनांच्या लेबलिंगसह विविध बाबींची कसून तपासणी करण्यात आली.

434 संस्थांची तपासणी; 135 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या 135 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित संस्थांकडून या त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, पुढील कारवाई त्यांच्या उत्तराच्या आधारे केली जाणार आहे.

या 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे

मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया

मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया

मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया

मे. कालिदास गांधी – पुणे

मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक

मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे

मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती

मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया

मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक

तपासणीत काय आढळले?

FDAच्या तपासणीदरम्यान काही संस्थांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती अनुपस्थित असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे समोर आले. काही ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण विभागाचीच व्यवस्था नव्हती, तर औषधांच्या चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचे आढळले.

काही उत्पादन परिसरांमध्ये अस्वच्छता आढळली. तसेच औषधांच्या लेबलवर चुकीच्या उत्पादन तारखा छापण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले.

याशिवाय कच्चा माल आणि तयार औषधांच्या चाचणीचे अभिलेख, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. विविध औषधांचे घटक एकमेकांत मिसळून भेसळीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या क्रॉस-कंटॅमिनेशन एसओपीचाही काही ठिकाणी अभाव होता.

‘नियम तोडणाऱ्यांची गय नाही’

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित औषधांच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. उत्पादन प्रक्रियेत नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत