नवी दिल्ली: मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
एकीकडे राहुल गांधींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुन्हा एकदा मोट बांधत ‘वोटचोरी’ कॅम्पेनद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारबाबत मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.या त्यांच्या दाव्यामुळे दिल्लीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी रेड्डी यांच्या दाव्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या गोटात काही प्रमाणात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावतीविषयी चर्चा न केल्याबद्दल घणाघाती टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याविषयी का बोलत नाही? कारण ते तर आमदारकीची निवडणूक हरले असल्याचं त्यांनी म्हटलं.
याचवेळी जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आंध्र प्रदेशबद्दल चकार शब्द काढत नसल्याचा गंभीर आरोपही केला. तसेच राहुल गांधींविषयी आपण काय बोलावे, जे स्वतः प्रामाणिक नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला..यामागे चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला.