कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड

महाराष्ट्र

नवी दिल्ली: कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. शेती, कापूस संशोधन, रेशीम उत्पादन तसेच पशुपालन व दुग्धव्यवसाय या क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या या व्यक्तींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे.

या यादीत उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील शेतकरी व पशुपालकांचा समावेश असून त्यांचे कार्य आज लाखो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

श्रीरंग लाड : कापूस शेतीत क्रांती

महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी नवोन्मेषक श्रीरंग देवाबा लाड यांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘दादा लाड कापूस तंत्रा’मुळे कापूस उत्पादनात ऐतिहासिक बदल घडून आला आहे.या तंत्रामुळे बियाणे कापसाचे उत्पादन तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले, तर हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेती हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

रघुपत सिंग : जैवविविधतेचे संवर्धक

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी गावचे रहिवासी रघुपत सिंग यांची शेती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ५५ हून अधिक भाजीपाला पिकांचे संवर्धन केले. यासोबतच त्यांनी १०० पेक्षा अधिक नवीन पिकांच्या जाती विकसित केल्या. बियाणे संवर्धन व जैवविविधतेच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

जोगेश देउरी : मुगा रेशीमाला जागतिक ओळख

आसाममधील प्रसिद्ध रेशीम शेतकरी जोगेश देउरी यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.मुगा रेशीम उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नैसर्गिक सोनेरी झळाळी, टिकाऊपणा आणि मजबुती ही मुगा रेशीमची वैशिष्ट्ये असून या रेशीमला जीआय टॅग देखील प्राप्त आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून रेशीम उद्योगाला नवी चालना मिळाली आहे.

रामा रेड्डी मामिदी : दुग्धव्यवसायाचे शिल्पकार

तेलंगणातील प्रसिद्ध पशुपालक रामा रेड्डी मामिदी यांना पशुपालन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील दुग्धव्यवसायाचे आधुनिकीकरण झाले असून अनेक शेतकऱ्यांना स्थिर आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे.

पद्म पुरस्कारांचे महत्त्व

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग, वैद्यक, क्रीडा आणि नागरी सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.दरवर्षी राष्ट्रपती भवनात आयोजित औपचारिक समारंभात भारताचे राष्ट्रपती हे पुरस्कार प्रदान करतात.