पत्र्याच्या घरातून राज्यसभेपर्यंत! गरिबी माझी कमजोरी नाही;  ज्योती वाघमारे यांचा संघर्षमय प्रवास

महाराष्ट्र

मुंबई: राज्यसभेच्या खासदारपदाच्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज होत असताना शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या ज्योती वाघमारे यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा आणि राजकीय प्रवासाचा भावनिक उलगडा केला. साध्या कुटुंबातून शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या जोरावर राज्यसभेपर्यंत पोहोचण्यामागील प्रेरणा आणि अनुभव त्यांनी स्पष्टपणे मांडले.

माझे वडील पँथर चळवळीचे बुलंद कार्यकर्ते होते आणि आजही ते तसेच आहेत. संघर्षाची जिद्द आणि सामाजिक भान मला त्यांच्याकडूनच मिळाले, असे सांगताना त्या म्हणाल्या, “विरासत में हर किसी को सोने-चांदी या जमीन-जायदाद नहीं मिलती, किसी को जिम्मेदारियां भी मिलती हैं.” वडिलांनी जपून ठेवलेली वृत्तपत्रांची कात्रणे आणि विचारांचा वारसा हेच माझे खरे भांडवल असल्याचे त्यांनी सांगितले.

बालपणीच्या आठवणी सांगताना वाघमारे म्हणाल्या की, पिंपळाच्या झाडाखाली बसून मी अभ्यास केला आहे. त्या दिवसांची आठवण झाली की आजही डोळे पाणावतात. “माझी गरिबी माझी कमजोरी कधीच ठरणार नाही. गरिबाच्या डोळ्यातील पाणी आणि त्यांच्या पोटातील भूक हेच संघर्षाचे इंधन असते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. सोलापूरमधील आपल्या परिसरातील बहुतेक लोक बांधकाम कामगार असल्याचे नमूद करत, शहरातील अनेक मोठी घरे आमच्या गल्लीतील मुलांनी बांधली, मात्र आमचीच घरे पत्र्याची होती, असे त्या म्हणाल्या.

अभ्यासाची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाल्याचे सांगताना त्यांनी बालपणीचा एक प्रसंगही सांगितला. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहा वर्षांच्या असताना वडिलांनी दिलेले भाषण पाठ केले. त्यातील “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” आणि “शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा” ही वाक्ये आयुष्यभरासाठी मनात कोरली गेली, असे त्यांनी सांगितले.

रमाई आंबेडकर यांच्या आयुष्यातील एका प्रसंगानेही मोठी प्रेरणा दिली, असे सांगताना त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांच्या नावापुढे लागलेली डिग्री हाच रमाईंचा खरा दागिना असल्याचे वाचल्यानंतर खूप शिकण्याचा निर्धार केला. शिक्षणासाठी अनेक अडचणी आल्या, कधी फी भरणेही कठीण झाले; तरीही शिक्षणात खंड पडू दिला नाही.

प्राध्यापिका होण्यासाठी प्रयत्न करत असताना आलेला कटू अनुभवही त्यांनी सांगितला. सर्व पात्रता असूनही नोकरीसाठी ४० लाख रुपयांचे डोनेशन मागितले गेले. “घराचे पत्रे विकले तरीही ते शक्य नव्हते,” असे सांगत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावरही भाष्य केले.संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक जाण यांच्या जोरावर आज राज्यसभेपर्यंत पोहोचल्याचे सांगत सामान्य माणसाचा आवाज संसदेत पोहोचवण्याची जबाबदारी मोठी असल्याची भावना ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.