कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे बंडखोरांवर कारवाईचे संकेत; तीन नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस

महाराष्ट्र

गट स्थापनेत सहकार्य न केल्याचा ठपका; उत्तर न दिल्यास अपात्रतेची प्रक्रिया सुरू होणार

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली असून समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. मात्र निकालानंतर नगरसेवक राहुल कोट, मधूर म्हात्रे, कीर्ती ढोणे आणि स्वप्निनी केणे काही काळ संपर्काबाहेर होते. त्यानंतर महापौर निवडणुकीच्या वेळी कीर्ती ढोणे उपस्थित राहिल्या, तर उर्वरित तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले.

या पार्श्वभूमीवर पक्षाने नगरसेवकांचा गट स्थापन करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण केली. आयुक्त कार्यालयाने ११ नगरसेवकांची नोंद केली असली तरी संबंधित तीन नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या तिन्ही नगरसेवकांना अंतिम नोटीस बजावत ४८ तासांत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. गट स्थापनेच्या प्रक्रियेत सहकार्य न केल्याने ही कृती पक्षविरोधी मानली जाऊ शकते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

पक्षाकडून यापूर्वीही वारंवार स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र संबंधित नगरसेवकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता अंतिम नोटीस देण्यात आली आहे.

दिलेल्या मुदतीत उत्तर न मिळाल्यास कोकण विभागीय आयुक्तांकडे संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय निर्णय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.