बारमधून सरकारी कारभार! दारुचे घोट रिचवत क्लिअर केल्या सरकारी फायली

क्राईम महाराष्ट्र

नागपूर: नागपूरच्या बिअर बारमध्ये प्रशासकीय कारभार चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारुचे घोट घेत महाराष्ट्र शासनच्या फाईलींवर सह्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिअर बारमधले ते तिघे नेमके कोण? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

रविवारी नागपूरच्या एका बारमध्ये भर दुपारी दारूचे घोट घेत तीन व्यक्ती चक्क महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बसले होते. त्यातील एक जण भरभर या फायलींवर सह्या करतानादेखील दिसत होता. या प्रकाराने शासकीय काम आता बारमध्ये होऊ लागली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकारामुळं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे अधिकारी कोण ते कोणत्या विभागाचे आणि त्यांनी कोणत्या फायलींवर सह्या केल्या हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. मात्र जर या फायली महत्त्वाच्या असतील तर त्यामुळं प्रशासनाच्या कार्यपद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अधिकारी कोण व फायली कोणत्या खात्याच्या?

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारी ३:३० च्या सुमारास तीन व्यक्ती मनीषनगरातील या बीअर बारमध्ये आल्या. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा एक मोठा गठ्ठा ठेवला. जवळपास तासभर त्यांच्यात या फायलींवरून गंभीर चर्चा सुरू होती. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होती, हे स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु चर्चेनंतर एका व्यक्तीने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फायलींवर भराभर सह्या करण्यास सुरुवात केली. नागपूरच्या मनीषनगरातील या प्रसिद्ध बिअर बारमध्ये जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळंच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला आहे.