मुंबई: वैद्यकीय शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, आपत्कालीन प्रसंगी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी असते, याचा प्रत्यय नुकताच गोवा ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान आला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि वसईचा रहिवासी असलेल्या डॉ. आर्यन लोलयेकर यांनी प्रसंगावधान दाखवत एका सहप्रवाशाला अक्षरशः जीवदान दिले.
ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी ३.५० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान मुंबईकडे रवाना झाले. उड्डाणानंतर काही वेळातच एका प्रवाशाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. क्षणातच त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि विमानात एकच खळबळ उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत विमानातील क्रू मेंबर्सनी, “विमानात कोणी डॉक्टर आहे का?” अशी विचारणा केली. यावेळी एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले डॉ. आर्यन लोलयेकर यांनी कोणताही विलंब न करता मदतीसाठी पुढाकार घेतला.
डॉ. आर्यन यांनी रुग्णाची तपासणी केली असता, त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे आढळले. पल्स रेट कमी होत होता आणि रुग्ण बेशुद्धावस्थेकडे जात होता. हजारो फूट उंचीवर असताना परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
उपलब्ध मर्यादित साधनसामग्रीतून डॉ. आर्यन यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा अचूक वापर करत तात्काळ प्रथमोपचार सुरू केले. विमानातील आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आला. त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली.
सुमारे ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. त्यानंतर इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने रुग्णाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवले.
या प्रसंगाबद्दल बोलताना डॉ. आर्यन म्हणाले,“प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली होती. मात्र वैद्यकीय शिक्षणामुळे धैर्य मिळाले. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असती. एका जिवाचे प्राण वाचवता आले, याचे समाधान खूप मोठे आहे.”
इंडिगो एअरलाइन्सकडून विशेष कौतुक
या कठीण प्रसंगी दाखवलेल्या धैर्य, तत्परता आणि जबाबदारीबद्दल इंडिगो एअरलाइन्स तसेच विमानातील प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. आर्यन यांचे आभार मानले. एका भावी डॉक्टरने आपले कर्तव्य चोख बजावत एका अनमोल जिवाचे रक्षण केल्याने सर्व स्तरांतून डॉ. आर्यन लोलयेकर यांचे कौतुक होत आहे.