आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! पंढरपूर विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्स, NDRF, CCTVसह चोख नियोजन

महाराष्ट्र

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूरमध्ये विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले की, आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्निशमन, परिवहन, वीज, मंदिर समिती आणि इतर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. वारीनंतर प्रत्येक वारकरी समाधानाने परतला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने आतापर्यंत ६७१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली असून, या निधीतून रस्ते, दर्शन मंडप, पायाभूत सुविधा आणि अन्य विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.

यंदाच्या वारीसाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली असून, अतिरिक्त ॲम्बुलन्स, आवश्यकतेनुसार बसेस, बसण्याची व्यवस्था आणि प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच NDRF, अग्निशमन दल, पोलीस, CCTV देखरेख, वाहतूक नियंत्रण, वीजपुरवठा आणि स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांकडूनही मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“पंढरीत व्हीआयपी कोणी नाही. मीही वारकरी म्हणून मुक्त दर्शन घेतले. प्रत्येक वारकऱ्याला सुलभ दर्शन मिळावे, हीच आमची भूमिका आहे,” असे सांगत शिंदे यांनी प्रशासनाला वारीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे निर्देश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत