पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा आणि विविध राजकीय मुद्द्यांवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. विकास प्रकल्प राबविताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, वाढत्या वारकरी संख्येमुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन आवश्यक आहे. मात्र, शेतकरी, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या भावना व हित अबाधित ठेवूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आषाढी एकादशीच्या दिवशी कॉरिडॉरविरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, विठ्ठलाच्या दर्शनाचा आणि वारीचा पवित्र सोहळा लक्षात घेऊन आंदोलन टाळण्याची विनंती संबंधितांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यकतेनुसार आरोग्य शिबिरांची संख्या वाढविण्यात येणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रभागा नदीतील पाणी व्यवस्थापनासह वारकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शक्तिपीठ महामार्गावरील विरोधाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र, त्याचे फायदे दिसल्यानंतर विरोध कमी झाला. स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले, “ही रामाची नव्हे, तर स्वतःच्या पक्षाची रक्षा करण्याची धडपड आहे.”
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाण प्रकरणावर बोलताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करण्याचे आवाहन केले.
विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे सांगत, “बळीराजा सुखी राहो, चांगला पाऊस पडो आणि सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचाच आहे,” असे नमूद केले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उस्थित होते.