मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील २.५ लाख हेक्टर फळबागांना दिलासा मिळण्याची शक्यता; शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी
मुंबई: राज्यातील तीव्र दुष्काळामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील फळबागा नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असताना या फळबागा वाचविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. फळबागांना पाणीपुरवठा करणे तसेच बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
केंद्र सरकारकडून व्हीबी जीरामजी योजनेंतर्गत राज्यातील ३७५ कामांसाठी ४ हजार ४२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीव्यतिरिक्त दुष्काळामुळे फळबागा बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रासाठी एकवेळची विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठविण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाईल. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीला रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, सहसचिव कैलास साळुंके, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे, फलोत्पादन संचालक जीवन बुंदे तसेच व्हीबी जीरामजी योजनेच्या आयुक्त अनिता मेश्राम दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.