चंद्रकांतदादा पाटील; महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेचे उद्घाटन
मुंबई : उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना पदवी देणे नसून, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनविणे आणि देशाच्या विकासात योगदान देणारा सुजाण नागरिक घडविणे हा आहे. याच उद्देशाने महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एलेट्स टेक्नोमीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे आयोजित ‘महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषद २०२६’ चे उद्घाटन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रजीत नाईक (ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एलेट्स टेक्नोमीडिया संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
‘विकसित भारत २०४७’च्या स्वप्नपूर्तीत उच्च शिक्षणाची महत्त्वाची भूमिका
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेशी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचे व्हिजन जोडलेले आहे. विद्यापीठांच्या वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांमधून विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होत आहेत. हेच विद्यार्थी उद्याच्या समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची पायाभरणी करणार आहेत.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण बनविणे आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. जगभरातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी महाराष्ट्रात यावे, संशोधकांनी नव्या संशोधनासाठी एकत्र यावे आणि जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण व्हावी, हे शासनाचे ध्येय आहे. महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषद २०२६ हे त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संशोधन, उद्योगाभिमुख शिक्षण आणि रोजगारनिर्मितीवर धोरणात्मक चर्चा
एलेट्स टेक्नोमीडिया संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांनी सांगितले की, या परिषदेत महाराष्ट्राला जागतिक शिक्षण केंद्र बनविण्याबरोबरच राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविणे, संशोधन, उद्योगाभिमुख शिक्षण, रोजगारनिर्मिती, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक चर्चा होणार आहे.
उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्यावर भर
अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार उद्योग आणि बाजारपेठेला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविणे, संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम बनविणे ही उच्च शिक्षण विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, नामांकित शैक्षणिक संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एका व्यासपीठावर आणून सर्वोत्तम कार्यपद्धती व विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे ही परिषद यशस्वी आणि फलदायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे आणि संशोधन-नवोपक्रमांच्या माध्यमातून राज्याला जागतिक शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.