अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन

महाराष्ट्र

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) २०२५–२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक १ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडणार असून अमरावती विद्यापीठ व शहरासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

देशभरातून या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. पुरुष गटातून १०७ तर महिला गटातून ९८ विद्यापीठ संघांनी सहभाग नोंदविला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यापीठांचा सहभाग असलेली सॉफ्टबॉल स्पर्धा अमरावतीत प्रथमच होत असून, ही या आयोजनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांच्या स्पर्धा एकाच यजमान संस्थेकडून होत असल्याने ३,५०० हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक व अधिकारी अमरावतीत दाखल होणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यातील विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांत विजेते ठरलेले संघ या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत असून, नामवंत खेळाडू, संघ मार्गदर्शक, पंच व तांत्रिक अधिकारी प्रथमच अमरावती शहरात येणार आहेत. त्यामुळे सॉफ्टबॉलमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार आहे.

भव्य उद्घाटन व चॅम्पियनशिप बॅटन मिरवणूक

या स्पर्धेचा शुभारंभ १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता भव्य उद्घाटन समारंभ व चॅम्पियनशिप बॅटन मिरवणुकीने होणार आहे. सर्व सहभागी संघ श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, डॉ. पंजाबराव देशमुख चौक, पंचवटी, अमरावती येथे एकत्र येतील. त्यानंतर मिरवणुकीद्वारे कृषिरत्न शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून मिरवणूक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणाऱ्या उद्घाटन समारंभस्थळी पोहोचेल.

अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेमुळे अमरावतीच्या क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय जोडला जाणार असून, शहराला राष्ट्रीय क्रीडा नकाशावर वेगळी ओळख मिळवून देणारी ही स्पर्धा ठरणार आहे.